Tuesday, July 19, 2005

"माडी"

'माडी' हा शब्द ऐकला, की सर्वसामान्य मराठी माणूस थोडा दचकतोच, पण घाबरु नका. ही मराठी 'माडी' (सामान्य नाम) नसून, कन्नड 'माडी' (क्रियापद) आहे. जवळपास ६ महिन्यांचं माझं कर्नाटकातलं वास्तव्य संपवून मी मागच्याच महिन्यात पुण्यनगरीत परत आलो. येताना बस मधे जवळपास १७ तास निवांत मिळाले. त्यातले पहिले ४ तास माझा पहिला ब्लॉग कोणत्या विषयावर लिहावा हे ठरवण्यात गेले, नंतरचे १० तास निद्रादेवीच्या आराधनेत व्यतीत केले आणि उरलेल्या ४ तासांची व्युत्पत्ती म्हणजे अस्मादिकांचा हा पहिला ब्लॉग.

हां, तर कन्नड मधे 'माडी' म्हणजे, 'कर' किंवा 'करा' अशा अर्थाचं क्रियापद आहे आणि खरं सांगतो, ही क्रिया अगदी पदोपदी अनुभवायला मिळते. ह्याचा सगळ्यात जास्त वापर होतो तो म्हणजे माझ्यासारख्या कानडी भाषा अवगत नसलेल्या पण तरीही बोलण्याचा किंवा शिकण्याचा अट्टाहास असलेल्या अकन्नड (हा शब्द 'अमराठी' च्या धर्तीवर आहे ) लोकांकडून.

पहिला कन्नड शब्द आमच्यासारखे लोक शिकतात, तो म्हणजे 'माडी'. बंगरुळला गेलो आणि येणाऱ्या फ़ॉर्वर्ड्स मधे पहिला शब्द बघायला मिळाला तो म्हणजे 'ऎंजॉय माडी'. मी जेंव्हा हा सब्जेक्ट असलेला मेल पहिल्यांदा बघितला, तेंव्हा माझ्या भोळ्या भाबड्या मराठी मनाला तो ऎक चावट मॆल वाटला. मोठ्या आशेनी मी तो उघडला , तर आत तसलं काहीच नाही! तेंव्हा मी आमच्या एका कानडी मित्राला 'माडी' चा अर्थ विचारला आणि त्याच दिवसापासून जिथे शक्य होईल तिथे त्या शब्दाचा वापर सुरु केला. पहिला यशस्वी प्रयोग केला तो म्हणजे रिक्शात. आधीच बंगरुळचे रिक्शावाले महान, ते एकतर कन्नड मधे बोलणार, नाही तर आंग्ल भाषेत. म्हणून मी रिक्शावाल्याला रस्ता दाखवतांना, 'राईट माडी', ' लेफ़्ट माडी' आणि 'स्टॉप माडी' असा 'माडी'शी खेळ करुन, त्याच्यासोबतचं पूर्ण संभाषण कन्नडमधेच(?) केलं.

त्यादिवसापासून माझा आत्मविश्वास सॉलिड वाढला आणि मी माझ्या मराठी मित्रांसोबत बोलतांना, नुसत्या कन्नडच नाही तर इंग्रजी आणि मराठी शब्दांनासुद्धा माडीवर न्यायला सुरु केलं. नमुन्यादाखल सांगायचं म्हणजे, 'चल माडी','हाल माडी', जेवण माडी' आणि एवढंच नाही तर 'चल, त्याला आपण बोर माडी'. (ही म्हणजे अगदी हाइट होती ) अजुन कशा कशाला मी माडी लावायला लागलो, हे आता आठवून, माझं मलाच हसू येतंय.

हे 'माडी-माडी' खेळण्यात काय मजा यायची म्हणून सांगू!!

त्यानंतरही मी थोडी फ़ार कन्नड शिकलो, पण 'माडी' हा शब्द वापरण्यात जी मजा यायची, ती दुसऱ्या कोणत्याच कन्नड शब्दात कधी आली नाही. ह्या माडीचा त्यातल्या त्यात जवळचा प्रतिस्पर्धी आहे, तो म्हणजे तमिळ 'चुम्मा' !! ( लक्षात घ्या, हे वाक्य द्वयर्थी नाही ) 'चुम्मा' म्हणजे, तमिळमधे 'सहंज'. जाऊ द्या, तो ऎक वेगळा विषय आहे, त्याबद्दल असंच नंतर कधी तरी....


--आनंद कुलकर्णी