Tuesday, January 31, 2006

अरे बापरे!! माझ्या मागच्या पोस्टवर सगळ्यांच्या खुप वेगवेगळ्या प्रतिक्रीया येतील, हे मला expected होतंच पण माझ्या मित्रांच्या इतक्या strong reactions येतील, असं मात्र मला खरंच वाटलं नव्हतं. लोकांनी माझं शेवटच्या ओळीतलं Disclaimer वाचलेलं दिसत नाहीये.. :)
Public, look at it as just another article of mine..not as a page from my diary or something. :):)

--Anand--

मला तिला बघायचंय ......

डोळे मिटले की, तिच समोर येते... कधी खळखळुन हसणारी, कधी माझ्याकडे बघुन गोड, लाडीकपणे हसणारी, कधी रडका चेहरा करुन आणि गाल फ़ुगवुन माझ्यावर रुसुन बसलेली, कधी रडवेली झालेली, तर कधी सगळ्या जगाचं ओझं तिच्याच खांद्यावर आहे अश्या अविर्भावात विचारमग्न झालेली... मी स्वत:ला इतका खुश पहिल्यांदाच बघतोय. खरंच प्रेम किती सुखद भावना आहे नाही?

मला तिला बघायचंय दिवसभर, रात्रभर.
मला बघायचंय ती सकाळी उठते, तेव्हा पहिली गोष्ट काय करते, आळस कसा देते, डोळे कसे चोळते, दात कसे घासते,तिच्या टूथ ब्रशचा रंग कोणता, तिला मिंटवाली टूथपेस्ट आवडते का स्ट्राइप्सवाली? ती कोणता साबण वापरते? तिच्या टॉवेलचा रंग कोणता? तिला कोणत्या रंगाचे कपडे आवडतात? तिला कोणत्या प्रकरचे कपडे आवडतात? तिला साडी नेसता येते का? पॅन्ट घालत असताना , ती डाव्या पायात आधी घालते की उजव्या पायात? टिशर्ट काढत असताना विस्कटलेले तिचे केस आणि त्यामुळे वैतागलेली ती, मला मनाच्या एका कोपर्यात हळुवारपणे जपुन ठेवायचे आहेत. तिला हिल्सवाली सॅन्डल आवडते का फ़्लॅट सोल असलेली चप्पल? ती कशात छान दिसते? आंघोळ झाल्यावर ती देवाला नमस्कार करते का? करत असेल तर मला देवासमोर ध्यान लावुन बसलेलं तिच ते रूप डोळे भरुन पहायचय. तिच्या आवडीचा देव कोणता ? कोणत्या देवाला ती मानते? देवाधर्मावर तिचा विश्वास नसेल, तर का नाही - हे मला तिला विचारायचंय.

तिला काय खायला आवडतं? गुलाबजाम घेताना ती वाटीत एका वेळी किती घेते? रसमलाइ घेताना ती रस जास्त घेते का मलाइ ? ठेचा खातना तिच्या डोळ्यातुन पाणी येतं का ? आणि येत असेल तर एकाच डोळ्यातुन येतं का दोन्ही डोळ्यातुन येतं, हे मला बघायचंय. मला तिच्या आवडीचे पदार्थ बनवुन ती थकलेली,वैतागलेली असताना तिला सरप्राइज द्यायचंय. मी कपडे बेडरूम मधे इकडे तिकडे पसरवुन टाकले की तिची होणारी चिड चिड ,तिचं लाल होणारं ते नाक... मला सगळं सगळं बघायचंय. लाइट गेले की ती घाबरते का? तिल लहान मुलं आवडतात का? आम्हाला पहिला मुलगा झालेला तिला आवडेल की मुलगी..हे मला तिला विचारायचंय.

तिला उगवणारा सुर्य आवडतो की मावळणारा? तिला कोणता खेळ बघायला/खेळायला आवडतो? पत्ते खेळत असताना मी मुद्दाम तिच्याशी हरतोय, हे तिच्या लक्षात येतय का, ते मला बघायचय. आई-बाबा त्याच रूम मधे असताना आणि त्यांचं लक्ष नसताना, मी तिचा हात पकडल्यावर तिचे गुलाबी होणारे गाल आणि लाजुन खाली गेलेली नजर मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवायचिये. मी रात्री घरी उशीरा आल्यावर , मझी वाट पहाता पहाता सोफ़्यावरच झोपलेली ती नाजुक बाहुली मला अलगद उचलुन नीट पलंगावर ठेवायचिये आणि तिच्या अंगावर पांघरुण घालायचंय. कधी तिला घरी यायला उशीर झाला, तर मी केलेला तिच्या आवडीचा स्वयंपाक बघुन संसारसुखाने सुखावलेली ती मला बघायचिये.

तिचा स्वभाव जाणुन घ्यायचाय अगदी तिच्या मनात येणारा प्रत्येक विचार तिनी स्वत: मला सांगण्या आधी माझ्या ओठातुन तो बाहेर येइल इतकं छान मला तिला कळुन घ्यायचंय. तिच्याशी भांडायचंय, नंतर वेडे वेडे चाळे करुन तिचा राग पळवायचाय आणि कधी तिच्याकडुन माझी स्वत:ची पण समजुत काढुन घ्यायचिये. मला आलेलं एखादं अपयश, तिच्या मिठीत विरघळुन मला विसरायचंय आणि आम्हाला मिळणार्या यशाचा प्रत्येक क्षण अन क्षण कायम लक्षात राहील, असा साजरा करायचाय.

तिला अगदी भरभरुन, माझ्याच्यानी होइल तितकं मला प्रेम द्यायचंय. तिनी वटपौर्णिमेला स्वत:हुन देवाकडे 'जन्मो जन्मी हाच पती मिळु दे' ही दरवर्षी मनापासुन प्रार्थना करावी असं मला बनायचंय..इतकं मला तिला आनंदात ठेवायचंय........

(This is a work of pure fiction and any resemblance to a person living/dead is purely coincidental ;) )
----आनंद कुलकर्णी

Wednesday, January 18, 2006

मला तुला आज काही तरी छान द्यायचं होतं,
पण मी तुला काय देणार? तुला तर देवानी आधीच सगळं दिलंय.
खुप विचार केला...खुप खुप विचार केला...
आणि मग ठरवलं....
आपल्याला कितीही महाग पडली तरी,
हिच्या सगळ्यात आवडीची गोष्टच देउयात....
हिला हसवुयात.....खुश ठेवुयात....

Friday, December 30, 2005

खरं म्हणजे, माझं हे ब्लॉग पेज बर्याच दिवसांपासून आहे..ब्लॉगच्या नावाप्रमाणे अधुन मधुन मी इथे काही तरी खरडतही असतो...
पण आज मरठीब्लॉग्ज.नेट वर काही खुपच मनापासुन लिहीलेले, सुंदर मराठी ब्लॉग्ज वाचले..ते वाचुन असं वाटलं की यारररर्र ब्लॉग्ज असावेत तर असे...

आता मी ठरवलंय की ....नीट आणि जरा रेग्युलर्ली लिहायचं...म्हणजे अगदी लिहायचंच आहे म्हणुन लिहायचं असं नाही किंवा बाकीच्या कोणाशी कॉम्पिटीशन म्हणुनही नाही पण...काही तरी लिहीलं की स्वत:लाच छान वाटतं म्हणुन लिहायचं....

Thursday, December 29, 2005

रोज नविन मुलगी भेटते....

रोज नविन मुलगी भेटते, माझ्याकडे बघुन हसते,
मी ही हसतो.
"कॉफ़ी प्यायला येणार का?" हा सुचक प्रश्न टाकते.
पाकीटातले पैसे मी मनात मोजतो,
"का नाही?" हा प्रतिप्रश्न विचारतो.

मग वेळ आणि जागा ठरते,
काळाची उलटी गणती सुरु होते.

ठरलेली वेळ येते, ती मोजून पाच मिनीटं उशिरा येते.
आपण आधी हसायला हवं, हे लक्षात येईपर्यंत,
ती हसून मोकळी होते.
मी आपला तसाच उभा ठोंब्यासारखा....

ती जवळ येते, "हॅलो, काय झालं?" विचारते.
मी गबाळ्यासारखा, "काही नाही, काही नाही" म्हणतो.

मग आम्ही कोपर्यातल्या टेबलाकडे जातो,
तो नेमका रिझर्वेड असतो.
चारी कोपर्यांची तिच कथा,
पाच मिनिटं कुठे बसावं यावर चर्चा.
शेवटी एक टेबल ठरतो.

वेटरला बोलवायला का कोण जाणे,
पण घशातनं आवाजंच येत नाही.

शेवटी वैतागून , तिच "एक्सक्युज मी!!" म्हणते.
मी कसनुसं हसतो.
दोघांची ऑर्डेर तिच देते,
मग पाच मिनिटं शांतता.

"आज हवा काय छान सुटलीये" तिचे उदगार,
"हातातला नॅपकीनचा बोळा कुठे टाकावा?" मी ह्या विचारात.
तिचं पुन्हा एकदा, "आज हवा काय छान सुटलीये!!",
"हो ना!! फ़ार धुळ डोळ्यात चाललीये", मी बरळतो.
ती ऎकून न ऎकल्यासारखं करते.

"आमच्या घराजवळनं एक मस्त बाग आहे" ती.
माझ्या डोळ्यासमोर शेजारच्या चितळ्यांची मुलगी येते,
मी म्हणतो, "आमच्यासुद्धा!"
"कालनं मी डी.डी.एल.जे. बाराव्यांदा बघितला" ती
मला काल रात्री बघितलेला भक्तीपट आठवतो.

पाच मिनीटं हे असंच चालतं.
मी ठरवतो, आता बास झालं,"अब अपनी बारी".
"काय हा योगायोग, आज आपले कपडेही मॅचींग आहेत" मी.
ती उठते, घड्याळाकडे बघते,
"उशीर झाला", असं म्हणून सरळ जायला निघते.

मी तिला थांबवायला जातो,
वेटर मला थांबवायला येतो,
मी बिल देईपर्यंत ती निघून जाते.
"काय चुकलं माझं?" हा प्रश्नं मनात येतो,
"आधी समोर बघ", खोल कुठून आवाज येतो.
समोर मोठ्ठा आरसा असतो,
माझा शर्ट हिरवा तर तिचा ड्रेस लाल असतो.

दुसर्या दिवशी ती परत दिसते,
मी तिच्याशी बोलायला जातो, पण तसाच परत येतो.
तेंव्हा पण तिचा ड्रेस लाल आणि माझा शर्ट हिरवा असतो....

तेवढ्यात समोरुन दुसरी मुलगी येते
आणि माझ्याकडे बघुन गोड हसते....

--आनंद कुलकर्णी

Saturday, December 24, 2005

मी आणि तू..

'मी' मधली वेलांटी तू आणि 'तू' मधला ऊकार मी
माझं क्षितीज तू , तुझं आकाश मी
माझा सुर तू , तुझा ताल मी
माझा आत्मा तू , तुझा प्राण मी

माझी कल्पना तू , तुझा विचार मी
माझी मर्यादा तू , तुझी गवसणी मी
माझ्या पंखातलं बळ तू , तुझ्या प्रगतीची गती मी
माझं अस्तित्व तू आणि तुझी ओळख मी

'मी' मधली वेलांटी तू आणि 'तू' मधला ऊकार मी.......ऊकार मी !!

--आनंद कुलकर्णी

Saturday, September 24, 2005

आज मला फ़ार एकटं एकटं वाटतंय,
आयुष्याच्या वाटेवरचं एक वळण चुकल्यासारखं वाटतंय,
पौर्णिमेच्या रात्री काळोखागत वाटतंय,
श्रावणातल्या ढगाला वैशाखागत वाटतंय. . . . . . . .
--आनंद कुलकर्णी

Tuesday, July 19, 2005

"माडी"

'माडी' हा शब्द ऐकला, की सर्वसामान्य मराठी माणूस थोडा दचकतोच, पण घाबरु नका. ही मराठी 'माडी' (सामान्य नाम) नसून, कन्नड 'माडी' (क्रियापद) आहे. जवळपास ६ महिन्यांचं माझं कर्नाटकातलं वास्तव्य संपवून मी मागच्याच महिन्यात पुण्यनगरीत परत आलो. येताना बस मधे जवळपास १७ तास निवांत मिळाले. त्यातले पहिले ४ तास माझा पहिला ब्लॉग कोणत्या विषयावर लिहावा हे ठरवण्यात गेले, नंतरचे १० तास निद्रादेवीच्या आराधनेत व्यतीत केले आणि उरलेल्या ४ तासांची व्युत्पत्ती म्हणजे अस्मादिकांचा हा पहिला ब्लॉग.

हां, तर कन्नड मधे 'माडी' म्हणजे, 'कर' किंवा 'करा' अशा अर्थाचं क्रियापद आहे आणि खरं सांगतो, ही क्रिया अगदी पदोपदी अनुभवायला मिळते. ह्याचा सगळ्यात जास्त वापर होतो तो म्हणजे माझ्यासारख्या कानडी भाषा अवगत नसलेल्या पण तरीही बोलण्याचा किंवा शिकण्याचा अट्टाहास असलेल्या अकन्नड (हा शब्द 'अमराठी' च्या धर्तीवर आहे ) लोकांकडून.

पहिला कन्नड शब्द आमच्यासारखे लोक शिकतात, तो म्हणजे 'माडी'. बंगरुळला गेलो आणि येणाऱ्या फ़ॉर्वर्ड्स मधे पहिला शब्द बघायला मिळाला तो म्हणजे 'ऎंजॉय माडी'. मी जेंव्हा हा सब्जेक्ट असलेला मेल पहिल्यांदा बघितला, तेंव्हा माझ्या भोळ्या भाबड्या मराठी मनाला तो ऎक चावट मॆल वाटला. मोठ्या आशेनी मी तो उघडला , तर आत तसलं काहीच नाही! तेंव्हा मी आमच्या एका कानडी मित्राला 'माडी' चा अर्थ विचारला आणि त्याच दिवसापासून जिथे शक्य होईल तिथे त्या शब्दाचा वापर सुरु केला. पहिला यशस्वी प्रयोग केला तो म्हणजे रिक्शात. आधीच बंगरुळचे रिक्शावाले महान, ते एकतर कन्नड मधे बोलणार, नाही तर आंग्ल भाषेत. म्हणून मी रिक्शावाल्याला रस्ता दाखवतांना, 'राईट माडी', ' लेफ़्ट माडी' आणि 'स्टॉप माडी' असा 'माडी'शी खेळ करुन, त्याच्यासोबतचं पूर्ण संभाषण कन्नडमधेच(?) केलं.

त्यादिवसापासून माझा आत्मविश्वास सॉलिड वाढला आणि मी माझ्या मराठी मित्रांसोबत बोलतांना, नुसत्या कन्नडच नाही तर इंग्रजी आणि मराठी शब्दांनासुद्धा माडीवर न्यायला सुरु केलं. नमुन्यादाखल सांगायचं म्हणजे, 'चल माडी','हाल माडी', जेवण माडी' आणि एवढंच नाही तर 'चल, त्याला आपण बोर माडी'. (ही म्हणजे अगदी हाइट होती ) अजुन कशा कशाला मी माडी लावायला लागलो, हे आता आठवून, माझं मलाच हसू येतंय.

हे 'माडी-माडी' खेळण्यात काय मजा यायची म्हणून सांगू!!

त्यानंतरही मी थोडी फ़ार कन्नड शिकलो, पण 'माडी' हा शब्द वापरण्यात जी मजा यायची, ती दुसऱ्या कोणत्याच कन्नड शब्दात कधी आली नाही. ह्या माडीचा त्यातल्या त्यात जवळचा प्रतिस्पर्धी आहे, तो म्हणजे तमिळ 'चुम्मा' !! ( लक्षात घ्या, हे वाक्य द्वयर्थी नाही ) 'चुम्मा' म्हणजे, तमिळमधे 'सहंज'. जाऊ द्या, तो ऎक वेगळा विषय आहे, त्याबद्दल असंच नंतर कधी तरी....


--आनंद कुलकर्णी